संत श्री गजानन महाराज ( Sant Shri Gajanan Maharaj Shegaon )

!! गण गण गणात बोते !!


॥ अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद ।
भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय ॥ 

-----

।। श्री गजानन महाराज परिचय ।।


संत श्री गजानन महाराजांना भगवान दत्तात्रेयांचे तिसरे रूप मानले जाते. आधीची दोन रूपे म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि शिर्डीचे साई बाबा.

महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगाव येथे २३ फेब्रुवारी १८७८ रोजी झाले. महाराजांच्या जन्माचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही, म्हणून २३ फेब्रुवारी हा दिवस ‘प्रगट दिन’ म्हणून साजरा केला जातो. गजानन महाराज परमज्ञानी, आध्यात्मिक आणि महान योगी होते.

महाराजांनी या भूतलावर अवघे ३२ वर्षे वास्तव्य केले. या काळात त्यांनी आपल्या अद्भुत लीलांद्वारे भक्तांचे जीवन समृद्ध केले. महाराज अवलिया संत होते, तरी स्वच्छतेबाबत अत्यंत जागरूक होते.

महाराजांनी भक्तांना रोगमुक्त व भयमुक्त केले, भूतबाधा दूर केल्या, गरिबांना उन्नत केले, तसेच कुत्सितांचे अज्ञान दूर करून दांभिकांना योग्य धडा शिकवला.

मानवतेला सदाचाराने समृद्ध करून महाराज ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधिस्त झाले. तत्पूर्वी दोन वर्षे आधीच त्यांनी समाधीचा दिवस व स्थान भक्तांना सूचित केले होते. त्यांनी उपदेश केला की, “मी नेहमी इथेच राहीन.”

-----

।। श्री गजानन महाराजांची आरती ।।


जय जय सतचित्स्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जड-मूढ ताराया ॥
जयदेव जयदेव ॥ धृ ॥

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
ते तू तत्त्व खरोखर नि:संशय अससी ।
लीलामात्रे धरिले मानवदेहासी ॥१॥

होऊ न देशी त्याची जाणीव तू कवणा ।
करुनी ‘गण गण गणात बोते’ या भजना ।
धाता नरहरी गुरुवर तूची सुखसदना ।
जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नयना ॥२॥

लीला अनंत केल्या बंकटसदनास ।
पेटविले त्या अग्नीवाचुनी चिलमेस ।
क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥३॥

व्याधी धारण करून केले कैकांना संपन्न ।
करविले भक्तालागी विठ्ठलदर्शन ।
भवसिंधू हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूचे मान्य करा वचन ॥४॥

-----

।। श्री गजानन महाराज बावन्नी ।।


जय जय सद्गुरू गजानना ।
रक्षक तूचि भक्तजना ॥१॥

निर्गुण तू परमात्मा तू ।
सगुण रूपात गजानन तू ॥२॥

सदेह तू परि विदेह तू ।
देह असूनि देहातीत तू ॥३॥

माघ वद्य सप्तमी दिनी ।
शेगावात प्रगटोनी ॥४॥

उष्ट्या पत्रावळी निमित्त ।
विदेहत्व तव हो प्रगट ॥५॥

बंकटलालावरी तुझी ।
कृपा जाहली ती साची ॥६॥

गोसाव्याच्या नवसासाठी ।
गांजा घेसी लावुनी ओठी ॥७॥

तव पदतीर्थे वाचविला ।
जानराव तो भक्त भला ॥८॥

जानकीराम चिंचवणे ।
नासवुनी स्वरूपी आणणे ॥९॥

मुक्या चंदूचे कानवले ।
खाऊनी कृतार्थ त्या केले ॥१०॥

विहिरीमाजी जलविहीना ।
केले देवा जलभरणा ॥११॥

मधमाश्यांचे डंख तुवा ।
सहन सुखे केले देवा ॥१२॥

त्यांचे काटे योगबळे ।
काढुनी सहजी दाखविले ॥१३॥

कुस्ती हरिशी खेळोनी ।
शक्तीदर्शन घडवोनी ॥१४॥

वेद म्हणुनी दाखविला ।
चकित द्रविड ब्राह्मण झाला ॥१५॥

जळत्या पर्यकावरती ।
ब्रह्मगिरीला ये प्रचिती ॥१६॥

टाकळीकर हरिदासाचा ।
अश्व शांत केला साचा ॥१७॥

बाळकृष्ण बाळापूरचा ।
समर्थ भक्तचि जो होता ॥१८॥

रामदासरूपे त्याला ।
दर्शन देवुनी तोषविला ॥१९॥

सुकलालाची गोमाता ।
द्वाड बहु होती ताता ॥२०॥

कृपा तुझी होताच क्षणी ।
शांत जाहली ती जननी ॥२१॥

घुडे लक्ष्मण शेगावी ।
येता व्याधी तू निरवी ॥२२॥

दांभिकता परि ती त्याची ।
तू न चालवूनी घे साची ॥२३॥

भास्कर पाटील तव भक्त ।
उद्धरिलासी तू त्वरीत ॥२४॥

आज्ञा तव शिरसा वंद्य ।
काकही मानती तुज वंद्य ॥२५॥

विहिरीमाजी रक्षियला ।
देवा तू गणू जवळ्याला ॥२६॥

पितांबराकरवी लीला ।
वठला आंबा पल्लविला ॥२७॥

सुबुद्धी देशी जोश्याला ।
माफ करी तो दंडाला ॥२८॥

सवड येथे गंगाभारती ।
थुंकुनी वारिली रक्तपित्ती ॥२९॥

पुंडलिकांचे गंडांतर ।
निष्ठा जाणुनी केले दूर ॥३०॥

ओंकारेश्वरी फुटली नौका ।
तारी नर्मदा क्षणात एका ॥३१॥

माधवनाथा समवेत ।
केले भोजन उच्छिष्ट ॥३२॥

लोकमान्य त्या टिळकांना ।
प्रसाद तूंची पाठविला ॥३३॥

कवरसुताची कांदा भाकर ।
भक्षिलीस त्वा प्रेमाखातर ॥३४॥

नग्न बसुनी गाडीत ।
लीला दाविली विपरीत ॥३५॥

बायदे चित्ती तव भक्ती ।
पुंडलिकावर विरक्त प्रीती ॥३६॥

बापुना मनी विठ्ठल भक्ती ।
स्वये होसी तू विठ्ठल मूर्ती ॥३७॥

कवठ्याचा त्या वारकऱ्याला ।
मरीपासुनी वाचविला ॥३८॥

वासुदेव यती तुज भेटे ।
प्रेमाची ती खूण पटे ॥३९॥

उद्धट झाला हवालदार ।
भस्मीभूत झाले घरदार ॥४०॥

देहांताच्या नंतरही ।
कितीजणांना अनुभव येई ॥४१॥

पडत्या मजुरा झेलियले ।
बघती जन आश्चर्य भले ॥४२॥

अंगावरती खांब पडे ।
स्त्री वांचे आश्चर्य घडे ॥४३॥

गजाननाच्या अद्भुत लीला ।
अनुभव येती आजमितीला ॥४४॥

शरण जाऊनी गजानना ।
दुःख तयाते करी कथना ॥४५॥

कृपा करी तो भक्तांसी ।
धावुनी येते वेगेसी ॥४६॥

गजाननाची बावन्नी ।
नित्य असावी ध्यानीमनी ॥४७॥

बावन्न गुरुवारी नेमे ।
करा पाठ बहु भक्तीने ॥४८॥

विघ्ने सारी पळती दूर ।
सर्वसुखाचा येई पूर ॥४९॥

चिंता साया दूर करी ।
संकटातून पार करी ॥५०॥

सदाचाररत सद्भक्ता ।
फळ लाभे बघता बघता ॥५१॥

सुरेश बोले जय बोला ।
गजाननाची जय बोला ॥५२॥

-----

।। श्री गजानन महाराज अष्टक (दासगणूकृत) ।।


गजानना गुणागरा परम मंगला पावना ।
अशींच अवघे हरिसी, दूरीत तेवी दुर्वासना ।
नसे त्रिभुवनामध्ये तुजविण आम्हां आसरा ।
करी पदनतावरी बहु दया, न रोषा धरा ॥१॥

निरालसपणे नसे घडली अल्प सेवा करी ।
तुझी पतितपावना, भटकलो वृथा भूवरी ।
विसंबत न गायी ती आपुलिया कधी वासरा ।
करी पदनतावरी बहु दया, न रोषा धरा ॥२॥

अलास जगी लावण्यां, परतुनी सु-वाटे जन ।
समर्थ गुरुराज ज्या, भूषवी नाम नारायण ।
म्हणून तुज प्रार्थना सतत जोडुनी करा ।
करी पदनतावरी बहु दया, न रोषा धरा ॥३॥

क्षणांत जल आणिले, नसुनी थेंब त्या वापिला ।
क्षणांत गमनाप्रती, करिसी इच्छिलेल्या स्थळा ।
क्षणांत स्वरूपे किती, विविध धरिसी धीवरा ।
करी पदनतावरी बहु दया, न रोषा धरा ॥४॥

अगाध करणी तुझी गुरुवरा, न लोकां कळे ।
तुला त्यजुनी व्यर्थ ते, आचरितात नाना खुळे ।
कृपा उदक मागती, त्यजुनी गौतमीच्या तिरा ।
करी पदनतावरी बहु दया, न रोषा धरा ॥५॥

समर्थ स्वरूपप्रती, धरुनी साच बाळापुरी ।
तुम्ही प्रगट जाहला, सुशील बाळकृष्णा घरी ।
हरिस्वरूप घेऊनी, दिली भेट भीमातिरा ।
करी पदनतावरी बहु दया, न रोषा धरा ॥६॥

सच्छिद्र नौकेप्रती, त्वदीय पाय हे लागतां ।
जलांत बुडतां तरी, तिजसी नर्मदा दे हाता ।
अशा तुजसी वाणण्यास, नच समर्थ माझी गिरा ।
करी पदनतावरी बहु दया, न रोषा धरा ॥७॥

अता न बहु बोलता, तव पदांबुजा वंदितो ।
पडो विसर ना कदा, मदीय हेचि मी मागतो ।
तुम्ही वरद आपुला, कर धरा गणूच्या शिरा ।
करी पदनतावरी बहु दया, न रोषा धरा ॥८॥

-----

।। श्री गजानन महाराज स्तोत्र ।।


हे सर्वाद्या सर्वशक्ती ।
हे जगदोद्वारा जगत्पती ।
साह्य व्हावे सत्वर गती ।
या लेकरा कारणे ॥१॥

जे जे काही ब्रह्मांडात ।
ते ते तुझे रूप सत्य ।
तुझ्या पुढे नाही खचित ।
कोणाचीही प्रतिष्ठा ॥२॥

तू निरंजन निराकार ।
तूच अवधूत दिगंबर ।
साकाररूप सर्वेश्वर ।
विश्वनाथ तूच की ॥३॥

जे जे काही म्हणावे ।
ते ते तुझे रूप बरवे ।
दासगणूस आता पावे ।
हीच आहे याचना ॥४॥

तूच काशी विश्वेश्वर ।
सोमनाथ बद्री-केदार ।
महाकाळ तसे ओंकार ।
तूच की रे त्र्यंबकेश्वर ॥५॥

भीमाशंकर मल्लिकार्जुन ।
नागनाथ पार्वतीरमण ।
श्री घृष्णेश्वर म्हणून ।
वेरुळगावी तूच की ॥६॥

तूच परळी वैजनाथ ।
निधीतटाला तूच स्थित ।
रामेश्वर पार्वतीकांत ।
सर्व संकट निवारता ॥७॥

हे कृपार्णव नारायणा ।
महाविष्णो आनंदघना ।
हे शेषशायी परिपूर्णा ।
नरहरी वामन रघुपते ॥८॥

तू वृंदावनी श्रीहरी ।
तू पांडुरंग पंढरपुरी ।
व्यंकटेश तू गिरीवरी ।
पुरीमध्ये जगन्नाथ ॥९॥

द्वारकेसी नंदनंदन ।
नाम देती तुज कारण ।
जैसे भक्तांचे इच्छील मन ।
तैसे तुज ठरविती ॥१०॥

आता हे चंद्रभागातटविहारा ।
या गजाननस्तोत्रा साह्य करा ।
हेच मागणे पसरुनी पदा ।
तुज विठ्ठले दासगणू ॥११॥

गजानन जे स्वरूप काही ।
ते तुझ्याविण वेगळे नाही ।
दत्त, भैरव, मार्तंड तेही ।
रूपे तुझीच अधोक्षजा ॥१२॥

या सर्व स्वरूपांकारण ।
आदरे मी करी वंदन ।
माझे त्रिताप करा हरण ।
हेच आहे मागणे ॥१३॥

हे महालक्ष्मी कुलदेवते ।
कृपाकटाक्षे लेकराते ।
पाही दासगणूते ।
हीच तुजला प्रार्थना ॥१४॥

आता श्रीशंकराचार्य गुरुवर ।
तेवी नाथ मच्छिंद्र ।
निवृत्तीदास ज्ञानेश्वर ।
समर्थ सज्जनगडीचे ॥१५॥

हे तुकारामा महासंता ।
तुजलागी दंडवता ।
करितो होई मला त्राता ।
नाही असे म्हणू नका ॥१६॥

हे शिर्डीकर बाबासाई ।
लेकरांसाठी धाव घेई ।
वामनशास्त्री माझे आई ।
माझी उपेक्षा करू नका ॥१७॥

हे शेगावच्या गजानना ।
महासंता आनंदघना ।
तुला येऊ दे काही करुणा ।
या अजाण दासगणूची ॥१८॥

तुम्हां सर्वा प्रार्थून ।
स्तोत्र करितो हे लेखन ।
माझ्या चित्ती म्हणून ।
वास आपण करावा ॥१९॥

जे जे तुम्ही वदवाल काही ।
तेच लिहीन कागदी पाहि ।
स्वतंत्रता मला नाही ।
मी पोसणा तुमचा असे ॥२०॥

माघमासी सप्तमीस ।
वद्यपक्षी शेगावात ।
तुम्ही प्रगटला पुण्यपुरुष ।
पंथाचिया माझारी ॥२१॥

उष्ट्या पत्रावळी शोधन ।
तुम्ही केल्या म्हणून ।
मिळाले की नामाभिमान ।
‘पिसा पिसा’ असे तुम्हा ॥२२॥

उगी न वाढावी महती ।
म्हणून ऐसी केली कृती ।
तुम्ही साच गुरुमूर्ती ।
लपून बसाया कारणे ॥२३॥

परि विचारवंत जे ज्ञानी ।
ते तुम्हालागी पाहुनी ।
भ्रमा हातफळी देऊनी ।
पाय तुमचे वंदितात ॥२४॥

बंकटलाल दामोदर ।
हे दोघे चतुर नर ।
भ्रमाते सारून दूर ।
शरण आले तुम्हांला ॥२५॥

बंकटलालाच्या सदनास ।
तुम्ही राहिला काही दिवस ।
तेथे जानराव देशमुखास ।
मरत असता वाचविले ॥२६॥

केवळ पाजुनिया तीर्थ ।
आपुल्या पदींचे समर्थ ।
तुजलागी दंडवत ।
असो आमुचा बरचेवर ॥२७॥

तुझिया लीलानिधीचा ।
नच लागे पार साचा ।
टिटवीने सागराचा अंत ।
कसा घेऊ शकेल? ॥२८॥

पितांबरास देऊनी भोपळा ।
नाल्यास तुम्ही पाठविला ।
जल ते हो आणविण्याला ।
तहान लागली म्हणून ॥२९॥

पितांबरासी बजाविले ।
ओंजळीने पाणी भले ।
न पाहिजे तुंवा भरले ।
या माझ्या भोपळ्यात ॥३०॥

जलांत तुंबा बुडवावा ।
जले पूर्ण भरून घ्यावा ।
आणि तोच मला आणून द्यावा ।
यांत अंतर करू नको ॥३१॥

तुंबा बुडेल असे पाणी ।
नव्हते नाल्यालागुनी ।
विश्वास ठेवूनिया वचनी ।
असे केले पितांबरे ॥३२॥

नाल्याच्या जलास ।
तुंबा तो लाविता सरस ।
आपोआप त्या ठायी ।
भव्य खाच पडली की ॥३३॥

तुंबा त्यांत भरत आला ।
ऐशी तुझी अगाध लीला ।
ती साच वर्णण्याला ।
शेषही थकेल वाटते ॥३४॥

सोमवारी प्रदोषासी ।
बंकटलालच्या सदनासी ।
भाविकां आपण व्योमकेशी ।
दिसतसा महाराजा ॥३५॥

यात नवल ना तिळभर ।
कारण तूच शंकर रमावर ।
हे जेवढे चराचर ।
तेवढे तुम्हीच आहात की ॥३६॥

तुझे स्वरूप यथातथ्य ।
मानवासी नाही कळत ।
म्हणून पडती भ्रमात ।
मायावश होऊनी ॥३७॥

प्रातःकाळाच्या वेळी ।
संपली होती दिवासळी ।
जानकीराम देईना मुळी ।
विस्तव तुमच्या चिलमीस ॥३८॥

जानकीराम सोनार ।
बागेसरीचा वैश्वानर ।
द्यावयासी कुरकुर ।
करू लागला असे की ॥३९॥

ते अंतर्ज्ञानी जाणून ।
कौतुक दाखविले करून ।
चिलमी विस्तवावाचून ।
पेटवूनिया दाखविली ॥४०॥

सोनार विस्तव देण्याला ।
नाही असे वदला ।
म्हणूनिया येता झाला ।
राग भगवंताकारणे ॥४१॥

चिंचवणे ते सोनाराचे ।
नासले अक्षय तृतीयेचे ।
प्राणघातक किड्यांचे ।
झाले त्यांत साम्राज्य ॥४२॥

अवघे टकमक पाहती ।
नाकावर पदर लाविती ।
एकमेकां सांगती ।
हे चिंचवणे खाऊ नका ॥४३॥

मग जानकीराम म्हणाला ।
साधूस विस्तव ना दिला ।
त्याचा हा प्रत्यय आला ।
धन्य धन्य हा गजानन ॥४४॥

मग तात्काळ उठून वेगेसी ।
आला बंकटलाल सदनासी ।
हकीकत बंकटलालासी ।
सर्व केली निवेदन ॥४५॥

बंकटलालाच्या वशिल्याने ।
चरण धरिले सोनाराने ।
अनन्यभाव भक्तीने ।
गजाननाचे तेव्हा ॥४६॥

गुरुराया अंतर ।
मऊ आपुले साचार ।
तेच का हो केले कठोर ।
मजविषयी समर्था ॥४७॥

आता या चिंचवण्यासी ।
हात लावा पुण्यराशी ।
त्याविण मी सदनासी ।
न जाई येथून ॥४८॥

ऐसी त्याची ऐकून गिरा ।
चिंचवण्यासी लाविला करा ।
चिंचवणे तेच झरा झरा ।
अमृताचा विबुध हो ॥४९॥

यापरी जानकीराम शरण आला ।
अखेर आपुल्या पदाला ।
मुकीनचंदु कृतार्थ केला ।
खाऊन दोन कानवले ॥५०॥

माधव नामे चिंचोलीचा ।
ब्राह्मण एक होता साचा ।
त्यास बोध अध्यात्माचा ।
तुम्हीच एक केलात ॥५१॥

भ्रांती त्याची उठविली ।
प्रपंचमाया तोडिली ।
मोक्ष पर्वणी लाभली ।
तया माधवाकारणे ॥५२॥

ऐसे आपुले महिमान ।
श्रेष्ठ आहे सर्वाहून ।
पदरी असल्या विपुल पुण्य ।
पाय तुझे सापडती ॥५३॥

वसंत पूजेकारण ।
घनपाठी ब्राह्मण ।
आणविले आपण ।
ऐनवेळी तेव्हा ॥५४॥

बंकटलालाने आपणांसी ।
नेले खावया मक्यासी ।
आपुल्या मळ्यासि ।
अति आग्रह करून ॥५५॥

मोहळे होती मळ्यात ।
मधमाशांची भव्य संख्या ।
ती पेटविता आगटीप्रत ।
उठती झाली निजलीले ॥५६॥

मधमाशा पाहून ।
लोक करिती पलायन ।
भय जिवाचे दारुण ।
आहे की प्रत्येकाला ॥५७॥

तुम्ही मात्र निर्धास्त ।
बैसता झाला मळ्यात ।
मधमाशा अतोनात ।
बसल्या तुमच्या अंगावरी ॥५८॥

लोक दूरून पाहती ।
परी न कोणाची होय छाती ।
तुम्हां सोडवाया गुरुमूर्ती ।
मधमाशांच्या त्रासांतून ॥५९॥

बंकटलाल दुःखी झाला ।
पाहून त्या माशांना ।
त्यांनी मात्र थोडा केला ।
प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा ॥६०॥

काही वेळ गेल्यावरी ।
तुम्हीच आज्ञा केली खरी ।
मधमाशांस जाया दुरी ।
ते अवघ्यांनी पाहिले ॥६१॥

आपुल्या आज्ञेनुसार ।
मधमाशा झाल्या दूर ।
बंकट म्हणे सोनार ।
आणवितो काटे काढावया ॥६२॥

कारण मधमाशांचे काटे ।
रुतले असतील मोठे ।
ते लपून बसती बेटे ।
स्वामी अवघ्या शरीरांत ॥६३॥

म्हणून ते काढावया ।
सोनार आणवितो या ठाया ।
आपण म्हणालात वाया ।
हा त्रास घेऊ नका ॥६४॥

योगशास्त्र येते मला ।
मी योगबळे काट्याला ।
बाहेर काढितो त्याला ।
सोनार कशास पाहिजे ॥६५॥

असे वदून कुंभक केला ।
तेव्हा की आपण भला ।
तेणे बाहेर काट्याला ।
पडणे अवश्य झाले की ॥६६॥

हे कौतुक सर्वांनी ।
पाहिले त्या ठिकाणी ।
जो तो मनुष्य जोडोनी पाणी ।
स्वामी आपणांकारणे ॥६७॥

आपण म्हणाला त्यावर ।
हे जीवांनो घटकाभर ।
बैसा या वृक्षावर ।
आता कोणास चावू नका ॥६८॥

संकल्प बंकटलालाचा ।
पूर्ण करणे आहे साचा ।
सोहळा मका सेवण्याचा ।
निर्विघ्न त्याचा होऊ द्या ॥६९॥

पहा माशा उठता क्षणी ।
तुम्ही गेलात पळूनी ।
संकट येता नाही कोणी ।
तारिता हे ध्यानी धरा ॥७०॥

लाडू, पेढे खावयास ।
लोक जमती विशेष ।
परी साह्य संकटास ।
कोणीही करीना ॥७१॥

हे तत्त्व ध्यानी धरा ।
ईश्वरासी आपुला करा ।
म्हणजे सफल होय खरा ।
तुमचा हा संसार ॥७२॥

ऐसा उपदेश भक्ताप्रती ।
साच केलात गुरुमूर्ती ।
एक्या मुखे करू किती ।
मी आपुले वर्णन ॥७३॥

कृष्णाजीच्या मळ्यात ।
दांभिक गोसावी आले बहुत ।
जे होते सांगत ।
शुष्क वेदांत जगाला ॥७४॥

त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी ।
महंत आणिला वाटेवरी ।
जो जळत्या पलंगावरी ।
तुम्हांजवळ ना बैसला ॥७५॥

चहूकडून होता पेटला ।
तो अग्नी आपण शांत केला ।
तेणे त्या ब्रह्मगिरीला ।
कौतुक अति वाटले ॥७६॥

सर्व अभिमान सोडून ।
आपणां तो आला शरण ।
अग्नीचे ते अग्नीपण ।
चांदण्यापरी केले तुम्ही ॥७७॥

टाकळीकर हरिदासाचा ।
घोडा अति द्वाड साचा ।
तुम्ही हरविला तयाचा ।
द्वाडपणा तो क्षणात ॥७८॥

घोडा आज्ञेत वागला ।
तो सर्वांनी पाहिला ।
अशक्य काही आपणाला ।
नाही उरले जगात ॥७९॥

अडगाव आकोली गावांत ।
कावळे शिरता भंडाऱ्यात ।
आपण पळविले क्षणात ।
आज्ञा त्यासी करून ॥८०॥

अजूनपर्यंत त्या ठायी ।
कावळा ये ना एकही ।
संत जे वदतील काही ।
खोटे होय कोठून ॥८१॥

प्रखर असुनी उन्हाळा ।
निर्जन त्या काननाला ।
ऐन दुपारच्या समयाला ।
कौतुक केले अभिनव ॥८२॥

अकोलीच्या रानात ।
सर्व्हे नंबर बावन्नात ।
एका शुष्क गर्दाडात ।
बनविली तुम्ही पुष्करिणी ॥८३॥

भक्त आपुला पितांबर ।
कृपा होती त्याचेवर ।
तयाचाही अधिकार ।
थोर आपण बनविला ॥८४॥

ज्योतीप्रति मिळाल्या ज्योत ।
भेद काही न तेथे उरत ।
खराच पितांबर पुण्यवंत ।
साक्षात्कारी जाहला ॥८५॥

वठलेल्या आंब्याला ।
त्यांनी आणविला पाला ।
कोंडोली ग्रामाला ।
हे कृत्य झाले की ॥८६॥

भीमा अमरजा संगमासी ।
क्षेत्र गाणगापुरासी ।
पर्णे फुटली टोणप्यासी ।
नरसिंह सरस्वती कृपेने ॥८७॥

तेच कृत्य कोंडोलीत ।
करविले पितांबरा हात ।
आपणच गुरुमूर्ती ।
हे स्वामी समर्था ॥८८॥

वद्य पक्षांत माघमासी ।
सोमवतीच्या पर्वासी ।
क्षेत्र ओंकारेश्वरासी ।
गेले असता भक्त तुमचे ॥८९॥

तेथे महानदी नर्मदेत ।
नौका फुटली अकस्मात ।
पाणी येऊ लागले आत ।
नाव बुडू लागली ॥९०॥

त्या नौकेत आपण होता ।
म्हणून नर्मदा लावी हात ।
फुटलेल्या ठायी तत्त्वता ।
असा प्रभाव आपुला हो ॥९१॥

नौका काठास लाविली ।
नर्मदेनें आणून भली ।
आपणां वंदून गुप्त झाली ।
हे बहुतांनी पाहिले ॥९२॥

त्र्यंबकपुत्र कवराचा ।
आपुला भक्त होता साचा ।
जो अभ्यास वैद्यकीचा ।
हैदराबादी करीत असे ॥९३॥

त्याची कांदा भाकर ।
आपण केली गोड फार ।
पदार्थ सारूनिया दूर ।
इतरांनी आणलेले ॥९४॥

जैसा द्वारकाधीश भगवान ।
कौरवांचे पक्वान्न ।
सांडूनिया भक्षण ।
करी विदुर कण्यांचे ॥९५॥

तैसेच आपण केले ।
कवराचे अन्न भक्षिले ।
खऱ्या भक्तीचे भुकेले ।
आपण आहा महाराजा ॥९६॥

सवडदचा गंगाभारती ।
तया फुटली रक्तपित्ती ।
तो त्रासून जिवाप्रती ।
आला असता आपणाकडे ॥९७॥

लोक अवघे तिटकारा ।
करू लागले त्याचा खरा ।
कोणी न देती त्यास थारा ।
रोगभयाने करून ॥९८॥

त्या गंगाभारतीस ।
येऊ न देती दर्शनास ।
कोणी आपल्या शेगावास ।
अशी स्थिती झाली ॥९९॥

लोक म्हणती तयाप्रत ।
मिसळू नकोस लोकांत ।
त्रास न द्यावा यत्किंचित् ।
तू समर्थाकारणे ॥१००॥

तो गोसावी एका दिवशी ।
आला आपल्या दर्शनासी ।
डोई ठेवता पायांसी ।
मारिले आपण तयाला ॥१०१॥

थोबाड झोडिले दोन्ही हातें ।
लाथ मारून कमरेतें ।
उलथून पाडिला रस्त्यातें ।
थुंकून त्याच्या अंगावरी ॥१०२॥

बेडका पडता अंगावर ।
गंगाभारती हर्षला फार ।
म्हणे आता होईल दूर ।
व्याधी माझी नि:संशय ॥१०३॥

जो बेडका होता पडला ।
तोच त्याने मलम केला ।
अवघ्या अंगास लाविला ।
चोळचोळूनिया निज हातें ॥१०४॥

ऐशा रीतीने सेवा करीत ।
राहिला गोसावी शेगावांत ।
तयाच्या महारोगाप्रत ।
आपण की हो निवटिले ॥१०५॥

तुमच्या कृपेच्या पुढे ।
औषध काय बापुडे ।
अमृत तेही फिके पडे ।
असा महिमा अगाध ॥१०६॥

कोणतेही संकट जरी ।
येऊन पडले भक्तांवरी ।
ते निजकृपेने करीतां दुरी ।
आपण साच दयाळा ॥१०७॥

संकटी खंडू पाटलाप्रत ।
आपण देऊन कृपेचा हात ।
न्यायाधीशाच्या कचेरीत ।
निर्दोष त्यासी सोडिले ॥१०८॥

बाळकृष्ण रामदासी ।
होता बाळापूर ग्रामासी ।
त्या माघ वद्य नवमीसी ।
समर्थदर्शन घडविले ॥१०९॥

घटकेंत दिसावा गजानन ।
घटकेंत सूर्याजीपंत नंदन ।
घटकेंत भजन ते गणगण ।
घटकेंत जयजय रघुवीर असे ॥११०॥

तेणे बाळकृष्ण घोटाळला ।
अखेर ओळखून आपणांला ।
समर्थ म्हणूनी नमस्कार केला ।
काय लीला वानू ती ॥१११॥

संत अधिकारें समान ।
मुळी न तेथे अधिक न्यून ।
जैसे भक्तांचे इच्छी मन ।
तैशी रूपे दिसती तया ॥११२॥

गणेशदादा खापर्डे ।
उमरावतीचे गृहस्थ बडे ।
कृपादृष्टीने त्यांकडे ।
पाहिले आपण सर्वदा ॥११३॥

या खापर्ड्याला वऱ्हाड प्रांती ।
अनभिषिक्त राजा बोलती ।
राष्ट्रोद्धाराची तळमळ ती ।
होती खापर्ड्याकारणे ॥११४॥

कोठे न आले अपयश त्याला ।
हा तुमच्या कृपेचा महिमा झाला ।
बाळ गंगाधर टिळकाला ।
तुम्हीच कृपा केलीत ॥११५॥

भगवंताने अर्जुनाला ।
भगवद्गीतेचा उपदेश केला ।
ज्या गीतेने जगाला ।
थक्क करून सोडिले ॥११६॥

पार्थ देवाचा भक्त जरी ।
राहिला वनवासाभीतरी ।
बारा वर्षे कांतारी ।
ऐसे भागवत सांगते ॥११७॥

भगवंताचा वशिला ।
प्रत्यक्ष असून अर्जुनाला ।
वनवास तो नाही चुकला ।
तैसेच झाले टिळकांचे ॥११८॥

संतकृपा असून ।
शिक्षा झाली दारुण ।
ब्रह्मदेशीं नेऊन ।
मंडल्याशी ठेविले त्या ॥११९॥

श्रोते त्याच मंडळ्यात ।
गीतारहस्य केला ग्रंथ ।
जो आबालवृद्धांप्रत ।
मान्य झाला सारखा ॥१२०॥

कोल्हटकरा हातें भला ।
आपण होता पाठविला ।
भाकरीच्या प्रसादाला ।
मुंबईत टिळकाकारणे ॥१२१॥

फळ हे त्या प्रसादाचे ।
गीतारहस्य होय साचे ।
भाष्यकार गीतेचे ।
हे सहावे झाले की ॥१२२॥

पहिले शंकराचार्य गुरुवर ।
दुसरे रामानुजाचार्य थोर ।
मध्व, वल्लभ त्यानंतर ।
भाष्यकार झाले ॥१२३॥

पाचवी ज्ञानेश्वर माऊली ।
भावार्थदीपिका टीका केली ।
जी मस्तकी धारण केली ।
अवघ्या मुमुक्षु जनांनी ॥१२४॥

ज्ञानेश्वरानंतर ।
एक-दोन टीकाकार ।
झाले परी ना आली सर ।
त्यांना ज्ञानेश्वर माऊलीची ॥१२५॥

वामनाची यथार्थदीपिका ।
तैसाच गीतार्णव देखा ।
हेही ग्रंथ भाविका ।
काही अंशे पटले की ॥१२६॥

गीतेचा अर्थ कर्मपर ।
लावी बाळ गंगाधर ।
त्या टिळकांचा अधिकार ।
वर्णाया मी समर्थ नसे ॥१२७॥

मागील टीका समयानुसार ।
अवतारल्या या भूमीवर ।
तैसाच आहे प्रकार ।
या गीतारहस्याचा ॥१२८॥

त्या लोकमान्य टिळकांवरी ।
आपण कृपा केली खरी ।
म्हणून तयाचा झाला करी ।
गीतारहस्य महाग्रंथ ॥१२९॥

खामगावी डॉक्टर कवरा ।
तीर्थ आणि अंगारा ।
आपण नेऊन दिलांत खरा ।
ब्राह्मणाच्या वेषाने ॥१३०॥

ज्यायोगे व्याधी त्याची ।
समूळ हरण झाली साची ।
तुम्ही काळजी भक्तांची ।
अहोरात्र वहातसा ॥१३१॥

कन्या हळदी मळ्याची ।
बायजा नामे मुंडगावची ।
ही तुमच्या कृपे जनीची ।
समता पावती झालीसे ॥१३२॥

वरदहस्त बायजाशिरी ।
तुम्ही ठेविता निर्धारी ।
तिही झाली अधिकारी ।
केवळ तुमच्या कृपेने ॥१३३॥

मुंडगावच्या पुंडलीकाला ।
होता जरी प्लेग झाला ।
तो येता दर्शनाला ।
व्याधी दुर्धर हरिली तुम्ही ॥१३४॥

सद्भक्त बापुन्याप्रती ।
तुम्ही भेटविता रुक्मिणीपती ।
नाही अशक्य कोणती ।
गोष्ट आपणांकारणे ॥१३५॥

एके वेळी आपणांला ।
गोपाळ बुटी घेऊन गेला ।
भोसल्याच्या नागपूराला ।
अति आग्रह करून ॥१३६॥

गोपाळ बुटी श्रीमंत भारी ।
हजारों पंक्ती त्यांचे घरी ।
उठू लागल्या वरचेवरी ।
केवळ आपल्या प्रीत्यर्थ ॥१३७॥

इकडे शेगाव सुनें पडलें ।
प्रेतवत दिसू लागलें ।
मुखी तेज नाही उरलें ।
मुळींच पाटील मंडळीच्या ॥१३८॥

शेगावचे पुष्कळ जन ।
आले नागपूरा जाऊन ।
परी न झाले दर्शन ।
समर्थांचे कोणाला ॥१३९॥

चौक्या पहारे सभोवती ।
कडेकोट होते फार ।
समर्थांच्या पायांवर ।
शीर ठेवणे मुश्किल झाले ॥१४०॥

नागपूराहून आपणाला ।
आणण्या हरि पाटील निघाला ।
दहा-पाच संगतीला ।
भक्त घेऊन शेगावचे ॥१४१॥

आला सिताबर्डीसी ।
गोपाळ बुटीच्या सदनाशी ।
तो तेथे दारापाशी ।
शिपाई पाहिले दोन-चार ॥१४२॥

शिपायांनी पाटलाला ।
जरी होता अटकाव केला ।
परी तो न त्यांनी जुमानिला ।
बळकट होता म्हणून ॥१४३॥

हरि पाटील शिरला आत ।
गडबड झाली तेथ बहुत ।
तुम्ही धावून त्याचा हात ।
धरिलात की प्रेमाने ॥१४४॥

जैसे वासरासी पाहता ।
गाय धावे पुण्यवंता ।
तैसेच तुम्ही समर्था ।
केलेंत घरी बुटीच्या ॥१४५॥

गोपाळ बुटी धावून आले ।
हरि पाटला विनविते झाले ।
पाटील माझे ऐकले ।
पाहिजे तुम्ही थोडेसे ॥१४६॥

भोजनोत्तर समर्थाला ।
जा घेऊन शेगावाला ।
तो आहे भक्तीस विकला ।
शेगावकरांच्या नि:संशय ॥१४७॥

सर्वांचे झाले भोजन ।
आपण निघाला तेथून ।
आशीर्वाद तो देऊन ।
गोपाळ बुटीच्या कुटुंबाला ॥१४८॥

त्या पाटील हरिवरी ।
कृपा आपुली अत्यंत खरी ।
श्रीकल्याणस्वामीपरी ।
सेवेस आपुल्या तत्पर जो ॥१४९॥

हरि पाटलाकारण ।
स्वामी तुमचे द्वयचरण ।
हेच महानिधान ।
जोडले असे वाटतसे ॥१५०॥

धार कल्याणचे रंगनाथ ।
आले तुम्हां भेटण्याप्रत ।
गुरुराया या शेगावात ।
शेगावचे भाग्य मोठे ॥१५१॥

श्रीवासुदेवानंद सरस्वती ।
जे प्रत्यक्ष दत्तमूर्ती ।
ऐशा जगमान्य विभूती ।
आल्या आपल्या दर्शना ॥१५२॥

जरी आपण देह ठेविला ।
तरी पावतसा भाविकाला ।
याचा अनुभव रतनसाला ।
आला आहे दयानिधे ॥१५३॥

रामचंद्र कृष्णाजी पाटील ।
भक्त तुमचा प्रेमळ ।
त्याची तुम्ही पुरविली आळ ।
गोसाव्याच्या रूपाने ॥१५४॥

तैसेच बोरीबंदरावरी ।
जांजळ जो का लक्ष्मण हरी ।
त्याला भेट दिली खरी ।
परमहंस रूपाने ॥१५५॥

तुमच्या लीलेचा तो पार ।
कोणा न लागे तिळभर ।
मुंगी मेरुमांदार ।
आक्रमण कैसी करी ॥१५६॥

टिटवीच्याने सागर ।
शोषवेल का साचार ।
दासगणू हा लाचार ।
आहे सर्व बाजूने ॥१५७॥

आपली वर्णन्या लीला ।
महाकवीच पाहिजे झाला ।
मजसारख्या घुंगुरड्याला ।
ते साधणे कठीण ॥१५८॥

परी जो का असे परिस ।
तो सुवर्ण करी लोखंडास ।
उरवी न त्याच्या ठायी दोष ।
लोहपणाचा येतुला हो ॥१५९॥

आपुली लीला कस्तुरी ।
मम वाणी मृत्तिका खरी ।
परी मान पावेल भूमिवरी ।
सहवासे या कस्तुरीच्या ॥१६०॥

माझे भाग्य धन्य धन्य ।
म्हणून तुमचे पाहिले चरण ।
आता न द्यावे लोटून ।
परत दासगणूला ॥१६१॥

सर्वदा सांभाळ माझा करा ।
दैन्यदुःखाते निवारा ।
भेटवा मशीं शारंगधरा ।
भक्त बापुन्याच्यापरी ॥१६२॥

आपल्या कृपेकरून ।
सानंद राहो सदा मन ।
सर्वदा घडो हरिस्मरण ।
तैसीच संगत सज्जनांची ॥१६३॥

अव्याहत वारी पंढरीची ।
मम करावी व्हावी साची ।
आवड सगुण भक्तीची ।
चित्त ठायी असू द्या ॥१६४॥

अंत घडो गोदातीरी ।
याविण आशा नाही दुसरी ।
स्मृती राहो जागृत खरी ।
भजन हरीचे करावया ॥१६५॥

भजन करता मोक्ष घडो ।
देह गोदातीरी पडो ।
सद्वत्कांसी स्नेह जडो ।
दासगणूचा सर्वदा ॥१६६॥

मागितले ते मला द्यावे ।
तैसे लोकांचेही पुरवावे ।
आर्त गुरुवरा मनोभावे ।
जे या स्तोत्रा पठतील ॥१६७॥

या स्तोत्राचा पाठ जेथ ।
भाव होईल तेथ तेथ ।
तेथे न राहो कदा दुरित ।
इतुलेही दयाळा ॥१६८॥

स्तोत्रपठकां उत्तम गती ।
तैशी संतती संपत्ती ।
धर्मवासना त्याच्या चित्ती ।
ठेवा जागृत निरंतर ॥१६९॥

भूतबाधा भानामती ।
व्हावी न स्तोत्रपठकांप्रती ।
लौकिक त्याचा भूवरती ।
उत्तरोत्तर वाढवावा ॥१७०॥

हे स्तोत्र ना अमृत ।
होईल अवघ्या भाविकांप्रत ।
येईल त्याची प्रचित ।
सद्भाव तो ठेविल्या ॥१७१॥

मोठ्याने करून गर्जना ।
बहावे साधू गजानना ।
शेगावचा योगीराणा ।
सर्वदा पावो तुम्हातें ॥१७२॥

सद्गुरुने चित्तास ।
पहा माझ्या करून वास ।
बोलविले या स्तोत्रास ।
तुमच्या हिताकारणे ॥१७३॥

याते असत्य मानल्यास ।
सुखाचा तो होईल नाश ।
भोगीत रहाल संकटास ।
वरचेवर अभक्तीने ॥१७४॥

अभक्ती ती दूर करा ।
गजाननाशी मुळी न विसरा ।
त्याच्या चरणी भाव धरा ।
म्हणजे जन्म सफल होई ॥१७५॥

स्तोत्रपठकांची आपदा ।
निमेलकी सर्वदा ।
दृढ चित्ती धरा पदां ।
गजानन साधूच्या ॥१७६॥

वाचे म्हणता गजानन ।
व्याधी जातील पळून ।
जैसे व्याघ्र पाहून ।
कोल्हे लांडगे पळती की ॥१७७॥

स्तोत्रपठका भूमीवरी ।
कोणी न राहील पहा वैरी ।
अखेर मोक्ष त्याच्या करी ।
येई की नि:संशय ॥१७८॥

शके अठराशे अडुसष्टांत ।
श्रीक्षेत्र शेगावात ।
समाधीपुढे मंडपात ।
रचियेलें स्तोत्र पहा ॥१७९॥

फाल्गून वद्य एकादशी ।
मंगळवार होता त्या दिवशी ।
स्तोत्र गेले कळसासी ।
गजाननाच्या कृपेने ॥१८०॥

शांति शांति त्रिवार शांति ।
असो या स्तोत्राप्रती ।
स्वामी गजानन गुरुमूर्ती ।
आठवा म्हणे दासगणू ॥१८१॥

।। श्रीहरिहरार्पणमस्तु ।। शुभं भवतु ।।

।। इति श्री संत गजानन प्रार्थना स्तोत्र समाप्त ।।

-----

॥ श्रींच्या गादीसमोर होणारी सायं आरती ॥


॥ श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ॥
(चाल : आरती भुवनसुंदराची)

ओवाळीतो स्वामीराया ।
माथा पदी ठेवूनीया ॥धृ॥

आवरी जगन्मोहिनीला ।
दावी चिन्मय स्वरूपाला ।
देई सद्बुद्धी मजला ।
प्रेमे तव यश गाण्याला ॥१॥

भक्तांकितां स्वामीराया ।
चरणी मी शरण ।
करुनी भय हरण ।
दावी सुखसदन ।

अमित मम दोष त्यागुनीयां ।
विनवितो दास तुला सदया ॥२॥

जन-पद-मुक्ति-पद-न्याया ।
स्थळी या अवतरला राया ।

ही जड मूढ मनुज-काया ।
पदी तव अर्पियली राया ॥३॥

हे दिग्वसन योगीराया ।
नको मज जनन, पुनरपि मरण ।
येत तुज शरण ।

पुरवी ही आस संतराया ।
प्रार्थना हीच असे पाया ॥४॥

नेण्या अज्ञान-तमा विलया ।
अलासी ज्ञान-रवी उदया ।
करी तू ज्ञानी जनाराया ।
निरसून मोह-पटल माया ॥५॥

गजानन संतराया ।
असशी बळवंत, तसा धीमंत ।
नको बघू अंत ।

विनवितो दास तुम्हा राया ।
नका त्या दूर करू सदया ॥६॥

-----

|| आरती ||


आरती सद्गुरू नाथा ।
अवलीया समर्था ।
आरती ओवाळीतो ।
मनोभावे मी आता ।
आरती सद्गुरू नाथा ।। धृ ।।

दिधले निजभक्ता ।
भावे इच्छीत फल त्वा,
पाजुनि ज्ञानामृता ।
उध्दरिले समर्था ।
आरती सद्गुरू नाथा ।। १ ।।

कविजन गुण गाता ।
थकियले समर्था ।
अघटित ऐसी लिला ।
मति धजि ही न आता ।
आरती सद्गुरू नाथा ।। २ ।।

विनंती भगवंता ।
तारी रामात्मज आता ।
आरती पूर्ण करितो ।
शरणागत बलवंता ।
आरती सद्गुरू नाथा ।। ३ ।।

-----

|| कापुरार्ती ||


जयजय कर्पूरगौरा ।
तारी जयजय कर्पूरगौरा ।। धृ ।।

भस्म हे चर्चित नील गलांबर ।
झळाळती रुंडमाळा ।
इंदु ललाटी शोभतसे कटी ।
गजचर्म व्याघ्रांबरा ।
शंभो जयजय कर्पूरगौरा ।। १ ।।

श्वेतासनी महाराज विराजित ।
अंकी बसे सुंदरा ।
भक्त दयाघन वंदिती चरण ।
धन्य तु लीलावतारा ।
शंभो जयजय कर्पूरगौरा ।। २ ।।

मतिमंद दीन झालो पदी लीन ।
पार करी संसारा ।
काशीसूतात्मज मागतसे तुज ।
द्या चरणी मज थारा ।
शंभो जयजय कर्पूरगौरा ।। ३ ।।

कर्पूरगौरं करूणावतारं ।
संसारसारं भुजगेंद्रहारं ।
सदा वसंतं हृदयारविंदे ।
भवं भवान्यासहित नमामि ।।

मंदारमाला कपाल काय ।
दिगंबराय दिगंबराय ।।
नमः शिवाय नमः शिवाय ।।

कर्पूर महादीप समर्पयामी ।।

-----

|| मंत्रपुष्पांजली ||


ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः ।।

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।।
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।।

ॐ स्वस्ति ।
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं
महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायीस्यात् ।
सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात
पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ।।

तदप्येष श्लोकोऽभिगीतो —
मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।।

तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।
ॐ पूर्ण ब्रह्माय धीमहि ।
तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।

-----

|| श्लोक ||


पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला ।
बहू मी अन्यायी परि सकळहि लाज तुजला ।।

न जाणे मी कांही जप तप पुजा साधन रिती ।
कृपादृष्टी पाहे शरण तुज आलो गणपती ।।

-----

|| श्लोक ||


(वृत्त - भुजंगप्रयात)

सदासर्वदा योग तुझा घडावा ।
तुझे कारणी देह माझा पडावा ।।
उपेक्षूं नको गुणवंता अनंता ।
रघुनायका मागणे हेचि आता ।।१।।

उपासनेला दृढ चालवावे ।
भूदेव-संतासि सदा नमावे ।
सत्कर्मयोगे वय घालवावे ।
सर्वामुखी मंगल बोलवावे ।।२।।

-----

|| नमस्काराष्टक ||


योगी दिगंबर विरक्तविदेही संत ।
उद्यान भक्तितरुचे फुलवी वसंत ।।
शेगांव क्षेत्र बनले गुरुच्या प्रभावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।१।।

ओहोळ घाण जल वाहत विषयांचे ।
भावार्थ तोय स्फटिकासम तेथ साचे ।।
तुंबी तुडुंब भरले किती स्तोत्र गावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।२।।

संत्रस्त पंक्तिस करी बहु काकपंक्ती ।
गेली क्षणात उठुनी परसोत उक्ती ।।
आत्मैक्य हे गुरूवरा, प्रचितीस यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।३।।

पेटूनी मंचक धडाडत अग्निज्वाला ।
मध्ये सुशांत गुरुमूर्ति न स्पर्श झाला ।।
ते योग वैभव पुन्हा नयना दिसावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।४।।

तारीयली सहजची तरि नर्मदेत ।
देवी सदिव्य प्रकटे नवलाव होत ।।
ज्याच्या कृपे भवजली तरुनीच जावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।५।।

जे ब्रह्म ब्रह्मगिरीला कळले न साच ।
पांडित्य मात्र नुसते उरला तसाच ।।
त्या सांगती नित मुखे हरीनाम घ्यावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।६।।

बाधे तृषा गुरुवरा जल ना मिळाले ।
खाचाड रूक्ष असतां झणि तोय आले ।।
प्रार्थू पदीं हृदय भक्ति जले वहावे ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।७।।

स्वामी समर्थ जगती अवतार घेती ।
कष्टोनि धेनु व्दिज धर्मचि रक्षिताती ।।
घ्या धेनुदास पदरी जरी पापि ठावें ।
वंदू गजानन पदांबुज भक्तिभावे ।।८।।

-----

|| श्लोक ||


ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ।
त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे ।।

मी ठेवितों मस्तक ज्या ठिकाणी ।
तेथे तुझें सद्गुरू पाय दोन्ही ।।

श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

-----

|| प्रदक्षिणा ||


यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे ।।

-----

|| क्षमापनम् ||


अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम ।
तस्मात्कारूण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर ।।

मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ।।

आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् ।
पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर ।।

श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।

-----

|| मंत्रपुष्पांजली ||


ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवः ।।

ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।।
स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु ।
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ।।

ॐ स्वस्ति ।
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं
महाराज्यमाधिपत्यमयं समन्त पर्यायीस्यात् ।
सार्वभौमः सार्वायुष आन्तादापरार्धात
पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति ।।

तदप्येष श्लोकोऽभिगीतो —
मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।।

तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।
ॐ पूर्ण ब्रह्माय धीमहि ।
तन्नो सद्गुरू प्रचोदयात् ।।

-----

Comments

  1. पुर्ण स्तोत्र नाही... 181 श्र्लोक आहे पण यात फक्त 45 दिलेत

    ReplyDelete
  2. पूर्ण स्तोत्र नाही, पूर्ण असायला हवे

    ReplyDelete
  3. पुर्ण स्तोत्र नाही... 181 श्र्लोक आहे पण यात फक्त 45 दिलेत

    ReplyDelete
  4. Very Nice, गण गण गणात बोते.........!

    ReplyDelete
  5. 181 स्तोत्रे आहेत ,इथे फक्त 45 आहेत,कृपया ही त्रुटी दूर करावी ।

    ReplyDelete
  6. JAI Gajanan. jai vithu mauli.

    ReplyDelete
  7. जय गजानन माऊली

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

हनुमान चालीसा ( Hanuman Chalisa )

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय ९